वीरगळ (Hero Stone)

वीरगळ (Herostone) : युद्धभूमीवर अथवा कोणत्याही संग्रामात वीरगती पावलेल्या माणसाच्या स्मरणार्थ उभारलेला वैशिष्ट्यपूर्ण दगड म्हणजे वीरगळहोय. वीरगळ हा शब्द वीर(संस्कृत) आणि कल्लू (कन्नड) अशा दोन शब्दांचा मिळून झाला आहे. कल्लू म्हणजे दगड अथवा शिळा. वीरपुरुषाची शिळा म्हणजेच वीरगळ. हे वीरगळ महाराष्ट्रात आणि कर्नाटकात बहुसंख्येने दिसतात. वीरगळाला वीराचा दगडकिंवा केवळ वीरम्हणूनही संबोधतात. वीरगळांचा उगम कर्नाटकात झाला, असे दिसते. तेथून त्यांचा महाराष्ट्रात प्रसार झाला. कन्नड प्रदेशातील कल्याणी चालुक्य, राष्ट्रकूट ह्या राजघराण्यांची सत्ता ज्या प्रदेशांवर पसरली होती, तेवढ्याच भागात वीर-कल आढळतात. महाराष्ट्रात आढळणारे वीरगळ मुख्यत्वे मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणचा बोरिवलीपर्यंतचा भाग इतक्या प्रदेशात पसरलेले आहेत. यांना ऐतिहासिक व शिल्पशास्त्रीय महत्त्व आहे. बोरिवलीरेल्वे स्थानकाजवळ एकसर गावात उत्तम दर्जाच्या सात वीरगळ आहेत. त्यांवरील कोरीव कामात युध्दाचा प्रसंग दाखविलेला असून हत्तींचे चित्रण आहे. याशिवाय नौका आणि वल्ही यांचेही चित्रण आहे.  अनंत स. अळतेकर यांच्या मते हे युध्द शिलाहार राजा सोमेश्वर व यादव राजा महादेव यांच्यातील असावे यावरील शिल्पपट्टांच्या धाटणीवरून ते इसवी सनाच्या तेराव्या शतकातील असावेत. 





महाराष्ट्रात वीरगळांचे दोन प्रकार दिसतात : एका प्रकारात वीराच्या दगडावर तीन-चारबहुधा तीनचौकटी कोरून यांत काही प्रसंग कोरतात. तीन चौकटी असलेल्या वीरगळावर सगळ्यात खालच्या चौकटीत जेथे तो वीर धारातीर्थी पडला, तेथील युध्दप्रसंग कोरलेला असतो. युध्दप्रसंगांत बरेच वैविध्य असते. उदा., ढाल-तलवारींनी समोरासमोर लढणारे सैनिक, घोडेस्वारांची लढाई, गाईच्या चोरीवरून लढाई झाली असल्यास गाईंचा कळप एका बाजूला असतो. त्याला गोवर्धन शिल्प म्हणतात. नाविक युध्द असल्यास अनेक वल्ह्यांच्या नावा दिसतात. खालून दुसऱ्या चौकटीत, वीरगती पावलेल्या माणसाला अप्सरा कैलासाला नेत आहेत, असे चित्र कोरलेले असते. हा प्रवास कधी पालखीतून, तर कधी रथातून होताना दिसतो आणि सगळ्यांत वरच्या चौकटीत कैलासामध्ये शिवाच्या पिंडीची पूजा करताना तो वीर दाखविलेला असतो. वीरगळाच्या सर्वांत वरच्या बाजूला देवळाच्या कळसासारखा भाग दिसतो व त्याच्या दोन्ही बाजूंस चंद्र-सूर्य कोरलेले असतात. जोपर्यंत चंद्र-सूर्य उगवत आहेत, तोवर ह्या वीराची कीर्ती कायम राहील, हे ह्यातून सांगावयाचे असते. वीरगळावर कधीकधी चार वा पाच चौकटीही असतात. क्वचित दगडाच्या चारही बाजूंवर कोरीव काम केलेले आढळते. ह्या प्रकारातील वीरगळांचा काळ अकरावे ते तेरावे शतक असा सांगता येईल. दुसऱ्या  प्रकारात अर्धउठावातील मानवी आकृती दिसते. ह्या प्रकारातले वीरसतराव्या-अठराव्या शतकांतील आहेत, असे त्यांच्या शैलीवरून म्हणता येते. महाराष्ट्रातील बहुतांश वीरगळ हे शिलाहारकाळ आणि यादवकाळात मोठ्या प्रमाणावर उभारले गेले.

कर्नाटकातल्या वीरगळांशी महाराष्ट्रातल्या वीरगळांचे विशेष साम्य आहे. कर्नाटक-महाराष्ट्रातील वीरगळांवर वीर हा कैलासावर शिवाची पूजा करताना दिसतो; कैलासवासी होतो. मात्र कर्नाटकातील गदगसारख्या काही ठिकाणी तो शिवाऐवजी विष्णूची वा नरसिंहाची पूजा करताना दिसतो; वैकुंठवासी होतो. शैव-वैष्णव वादाची छाया वीरगळांवर ही पडलेली दिसते.

कर्नाटकातील वीर-कलांचे थोडे सूक्ष्म निरीक्षण केल्यास त्यांचे मूळ स्मृतिमंदिरांत असल्याचे स्पष्ट होते. अनेक वीर-कलांवर, चित्रचौकटींवर मंदिरांच्या प्रतिकृती कोरलेल्या आहेत. द्राविड मंदिरशिल्पाच्या प्रतिकृती स्पष्ट दिसतात. राजघराण्यांतील व्यक्तींच्या स्मरणार्थ देवांची मंदिरे बांधली जात. सामान्य माणसे मंदिरे बांधण्याऐवजी त्यांच्या छोटेखानी प्रतिकृती निर्माण करून वीरांची स्मृती जतन करीत. वीरगती पावलेल्या माणसांच्या स्मरणार्थ राजस्थानात पालियाउभारतात. मात्र येथे बऱ्याच वेळी दगडाऐवजी लाकडाचा वापर करून स्तंभ उभारले जातात. कधी फलकांचाही ह्यासाठी वापर केला जातो. 

१. रतनवाडीतील अमृतेश्वर मंदिराच्या बाजूला असणारा वीरगळ

२. राजमाचीच्या भैरवनाथ मंदिराच्या बाजूस असणारा वीरगळ

३. माहुली किल्ल्यावरील भग्नावस्थेतील वीरगळ

४. 
यादवकालीन वीरगळ : बळसाणे, जि. धुळे (महाराष्ट्र), १३ वे शतक.

५.