बहिणाबाई चौधरी

1)
अरे संसार संसार
जसा तावा चुल्ह्यावर
आंधी हाताले चटके
तव्हां मियते भाकर
अरे संसार संसार
खोटा कधीं म्हनूं नहीं
राऊळाच्या कयसाले
लोटा कधीं म्हनूं नहीं

अरे, संसार संसार
नहीं रडन कुढनं
येड्या, गयांतला हार
म्हनूं नको रे लोढनं
अरे, संसार संसार
खीरा येलावरचा तोड
एक तोंड मधी कडु
बाकी अवघा लागे गोड

अरे, संसार संसार म्हनूं नको रे भीलावा
त्याले गोड भीमफूल मधी गोंडब्याचा ठेवा
देखा संसार संसार शेंग वरतून कांटे
अरे, वरतून कांटे मधीं चिक्ने सागरगोटे

ऐका, संसार संसार दोन्ही जीवाचा ईचार
देतो दुःखाले होकार अन् सुखाले नकार
देखा संसार संसार दोन्ही जीवाचा सुधार
कधीं नगद उधार सुखादुखाचा बेपार

अरे, संसार संसार असा मोठा जादूगार
माझ्या जीवाचा मंतर त्याच्यावरती मदार
असा संसार संसार आधी देवाचा ईसार
माझ्या दैवाचा जोजार मंग जीवाचा आधार !



2)
अरे रडता रडता डोळे भरले भरले
आसू सरले सरले आता हुंदके उरले
आसू सरले सरले माझा मलेच इसावा
असा आसवा बिगर रडू नको माझ्या जीवा


सांग सांग धरती माता अशी कशी जादू झाली
 झाड़ गेलं निंधीसनी माघं सावली उराली
देव गेले देवा घरी आठी ठेयीसनी ठेवा
डोळ्या पुढे दोन लाल रडू नको माझ्या जीवा

रडू नको माझ्या जीवा तुले रड्याचीरे सवं
आसू हसावं रे जरा त्यात संसाराची चव
कुकू पुसलं पुसलं आता उरलं गोंधन
तेच देइल देइल नशिबले आवतन

जरी फुटल्या बांगड्या मनगटी करतूत
तुटे मंगयसुतर उरे गयाची शपत
नका नका आया बाया नका करू माझी कीव
झालं माझं समाधान आता माझा मले जिव


3)
अरे खोप्यामधी खोपा सुगरनीचा चांगला
देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला..
पिलं निजले खोप्यात जसा झूलता बंगला
तिचा पिलामधि जीव जीव झाडाले टांगला..!
सुगरिन सुगरिन अशी माझी रे चतुर
तिले जल्माचा सांगाती मिये गन्यागम्प्या नर
खोपा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा
पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा !
तिची उलूशीच चोच, तेच दात, तेच ओठ
तुले देले रे देवानं दोन हात दहा बोटं ?




4)
मन वढाय वढाय उभ्या पीकातलं ढोर,
किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर...
मन मोकाट मोकाट त्याले ठायी ठायी वाटा
जशा वा-यान चालल्या पान्यावरल्या रे लाटा
मन लहरी लहरी त्याले हाती धरे कोनं?
उंडारलं उंडारलं जसं वारा वाहादन
मन जह्यरी जह्यरी याचं न्यारं रे तंतर
आरे इचू साप बरा त्याले उतारे मंतर !
मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू बात
आता व्हतं भुईवर गेलं गेलं आभायात..
मन चप्पय चप्पय त्याले नहीं ज़रा धीर
तठे व्हईसनी ईज आलं आलं धर्तीवर
मन एवढ एवढ जसा खाकसचा दाना
मन केवढ केवढ? आभायात बी मायेना
देवा, कसं देलं मन आसं नाही दुनियात
आसा कसा रे तू योगी काय तुझी करामत!
देवा आसं कसं मन आसं कसं रे घडलं?
कुठे जागेपनी तूले आसं सपन पडलं!




5)
माझी माय सरसोती माले शिकवते बोली
लेक बहिनाच्या मनी किती गुपितं पेरली!
माझ्यासाठी पांडुरंगा तुझं गीता-भागवत
पावसात सामावतं माटीमधी उगवतं..



अरे देवाच दर्सन झालं झालं आपसुक
हिरिदात सुर्यबापा दाये अरूपाच रूप..
तुझ्या पायाची चाहूल  लागे पानापानामंधी
देवा तुझं येन-जान वारा सांगे कानामंधी



फुलामधि सामावला धरत्रीचा परमय
माझ्या नाकाले इचारा नथनीले त्याचं काय?
किती रंगवशी रंग रंग भरले डोयात
माझ्यासाठी शिरीरंग रंग खेये आभायात..!
धर्ती मधल्या रसानं जीभ माझी सवादते
तव्हा तोंडातली चव पिंडामधी ठाव घेते..!




6)
धरीत्रीच्या कुशीमधीं बीयबियानं निजलीं
व-हे पसरली माती जशी शाल पांघरली
बीय टरारे भुईत सर्वे कोंब आले व-हे
गह्यरलं शेत जसं अंगावरतीं शहारे



ऊन वा-याशीं खेयतां एका एका कोंबांतून
पर्गटले दोन पानं जसे हात जोडीसन
टाया वाजवती पानं दंग देवाच्या भजनीं
जसे करती कारोन्या होऊं दे रे आबादानी


दिसामासा व्हये वाढ रोप झाली आतां मोठी
आला पिकाले बहार झाली शेतामधी दाटी
कसे वा-‍यानं डोलती दाने आले गाडी गाडी
दैव गेलं रे उघडी देव अजब गारोडी !




7)
पेरनी पेरनी आले पावसाचे वारे
बोलला पोपया पेर्ते व्हा रे, पेर्ते व्हा रे!
पेरनी पेरनी आभायात गडगड,
बरस बरस माझ्या उरी धडधड!



पेरनी पेरनी आता मिरुग बी सरे.
बोलेना पोपया पेर्ते व्हा रे, पेर्ते व्हा रे!
पेरनी पेरनी अवघ्या जगाच्या कारनी.
ढोराच्या चारनी, कोटी पोटाची भरनी



8)
आशी कशी येळी व माये, आशी कशी येळी?



बारा गाडे काजळ कुंकू पुरल नहीं लेनं
साती समदुराचं पानी झालं नही न्हानं
आशी कशी येळी व माये, आशी कशी येळी?




धरतीवरलं चांदी सोनं डागीन्याची तूट
आभायाचं चोयी लुगडं तेभी झालं थिटं

आशी कशी येळी वो माये, आशी कशी येळी?



इडा पिडा संकटाले देल्हा तूनें टाया
झाल्या तुझ्या गयामंधीं नरोंडाच्या माया
आशी कशी येळी व माये , आशी कशी येळी?



बरह्मा इस्नू रुद्र बाळ खेळईले वटीं
कोम्हायता फुटे पान्हा गानं आलं व्होटीं
आशी कशी येळी वो माये, आशी कशी येळी?



नशीबाचे नऊ गिर्‍हे काय तुझ्या लेखीं?
गिर्‍ह्यानाले खाईसनी कशी झाली सुखी ?
आशी कशी येळी वो माये, आशी कशी येळी?




नऊ झनासी खाउन गेली सहज एक्या गोष्टी
दहाव्याशी खाईन तेव्हां कुठें राहिन सृष्टीं
आशी कशी येळी वो माये, आशी कशी येळी?
 
9)
देवा, घरोट घरोट तुझ्या मनांतली गोट
सर्व्या दुनियेचं पोट घरीं कर्माचा मरोट
अरे, घरोट घरोट वानी बाम्हनाचं जातं,
कसा घरघर वाजे त्याले म्हनवा घरोट




अरे, जोडतां तोडलं त्याले तानं म्हनू नहीं
ज्याच्यांतून येतं पीठ त्याले जातं म्हनूं नहीं
कसा घरोट घरोट माझा वाजे घरघर
घरघरींतून माले माले ऐकूं येतो सूर




त्यांत आहे घरघर येड्या, आपल्या घराची
अरे, आहे घरघर त्यांत भर्ल्या आभायाची
आतां घरोटा घरोटा दयन मांडलं नीट
अरे, घंट्या भरामधीं कर त्याचं आतां पीठ




चाल घरोटा घरोटा तुझी चाले घरघर
तुझ्या घरघरींतून पीठ गये भरभर
जशी तुझी रे घरोटा पाऊ फिरे गरगर
तसं दुधावानी पीठ पडतं रे भूईवर




अरे, घरोटा घरोटा तुझ्या माकनीची आस
माझ्या एका हातीं खुटा दुज्या हातीं देते घांस
अरे, घरोटा घरोटा घांस माझा जवारीचा
तुले सनासुदी गहूं कधीं देते बाजरीचा




माझा घरोट घरोट दोन दाढा दोन व्होट
दाने खाये मूठ मूठ त्याच्यातून गये पीठ
अरे, घरोटा घरोटा माझे दुखतां रे हात
तसं संसाराचं गानं माझं बसते मी गात




अरे, घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठी
तसं तसं माझं गानं पोटातून येतं व्होटीं
दाने दयतां दयतां जशी घामानं मी भिजे
तुझी घरोटा घरोटा तशी पाऊ तुझी झिजे




झिजिसनी झिजीसनी झाला संगमरवरी
बापा, तुले टाकलाये टकारीन आली दारीं !




10)
बापाजीच्या हायलींत येती शेट शेतकरी
दारी खेटराची रास घरीं भरली कचेरी




गांवामधी दबदबा बाप महाजन माझा
त्याचा कांटेतोल न्याव जसा गांवमधीं राजा




माय भीमाई माऊली जशी आंब्याची साऊली
आम्हाईले केलं गार सोता उन्हांत तावली




तुझे भाऊ देवा घरीं नहीं मायबाप तुले
तुले कशाचं माहेर लागे कुलूप दाराले




भाऊ 'घमा' गाये घाम 'गना' भगत गनांत
'धना' माझा लिखनार गेला शिक्याले धुयांत




आम्ही बहीनी 'आह्यला'  'सीता, तुयसा, बहीना'
देल्या आशीलाचे घरीं सगेसाई मोतीदाना




लागे पायाले चटके रस्ता तापीसनी लाल
माझ्या माहेरची वाट माले वाटे मखमल




जीव व्हती लाही लाही चैत्र वैसागाचं ऊन
पाय पडतां 'लौकींत' शीन जातो निंघीसन




तापीवानी नही थडी जरी वाहे थोडी थोडी
पानी 'लौकी'चं नित्तय त्याले अम्रीताची गोडी




माहेरून ये निरोप सांगे कानामंधि वारा
माझ्या माहेराच्या खेपा 'लौकी' नदीले विचारा !