शिराळशेट

१३८५ च्या सुमारास महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळी बहामनी राजवट होती व महमूदशहा बहायनीचे महाराष्ट्रावर राज्य होते. हा राजा प्रजादक्ष होता. या राजाने गुलबर्गा, बिदर, कंधार, दौलताबाद, एलिचपूर, चौल व दाभोड या ठिकाणी अनाथालये उघडली होती. त्याच्या राज्यात शिराळशेट  (किंवा श्रीयाळ श्रेष्ठी) नावाचा एक सत्प्रवृत्तीचा लिंगायत वाणी होता. या दुष्काळात शिराळशेठने अनेकांचे प्राण वाचवले. आपली सर्व संपत्ती विकून लमाणांच्या करवी बैलांच्या पाठीवरून गुजरातेतून धान्य आणून दुष्काळपीडित लोकांना मोफत दिले. या राजाचे कौतुक एवढय़ासाठी की, शिराळशेठने केलेले प्रयत्न पाहून समाधान व्यक्त केले व त्याला राजदरबारी पाचारण करून धन्यवाद देऊन इच्छा असेल ते मागून घेण्यास सांगितले. शिराळशेठ मोठा चतुर असला पाहिजे. त्याने साडेतीन घटकांचे राज्यपद मागून घेतले व महमूदशहा बादशहाने त्याला ते आनंदाने दिले. कराराप्रमाणे राजाने आपली राज्यमोहोर त्याच्या स्वाधीन केली. या लक्ष्मीसंपन्न माणसाने स्वत:करता एक ढबू पैसाही घेतला नाही व आलेल्या अमोल संधीचा उपयोग इतरांसाठी केला. देवाधर्मासाठी केला व म्हणून तो अजरामर झाला. जप्त केलेली हिंदू मंदिरे व खालसा केलेले त्यांचे उत्पन्न शिराळशेठने राज्यमोहोर लावून सरकारी आज्ञेने परत केली. जप्त झालेली अनेक इनामे व जमिनी परत केल्या व दानधर्म केला. त्याच्या या कृतीने बादशहा अधिकच खूश झाला व शिराळशेठच्या इच्छेप्रमाणे अंमलबजावणी करण्यास त्याने फर्मावले. या ठिकाणी पुन्हा बादशहाचे औदार्य दिसून येते. इतकेच नव्हे तर त्याने शिराळशेठच्या मुलाला बोलावून त्याला सरदारकी बहाल केली.

श्रावण शुद्ध षष्ठीला शिराळशेठच्या प्रतिमांचे पूजन होते. आदल्या दिवशी तेथील कुंभाराकडे पाट दिला जाई व त्या पाटावर कुंभार शिराळशेठची बैलावर बसलेली प्रतिमा, शिराळशेठपुढे त्याचा श्वान व घरातील मंडळी असा देखावा केलेला असतो. या सर्वाची करडीच्या बिया, पताका आदी गोष्टींनी आरास केलेली असते. असा सजवलेला पाट आणून शिराळशेठची पूजा होते व संध्याकाळी त्याचे विसर्जन केले जाते.
पूर्वी पुण्यात श्रावणात महिनाभर अनेक ठिकाणी शिराळशेठचा मातीचा पुतळा बसवला जात असे. हा पुतळा आतून पोकळ व पोटाच्या जागी मागून मोकळा असे. त्यात भुसा, धलप्या इ. घालून त्याचा धूर शिराळशेठच्या तोंडातल्या चिलमीतून धूर निघत असे.

शिराळशेठने साडेतीन घटकांचे राज्यपद मागून आपली अनेक मंदिरे बहामनी राजांच्या जप्तीतून मुक्त केली म्हणून अनेक मंदिरात त्याचा दगडी पुतळाही दिसतो तो फोटो सोबत देत आहे.
सामान्य लोकांच्या मनातला हा साडेतीन घटकांचा राजा व त्याच्याबद्दलची कृतज्ञता हे त्या पुतळ्याचे प्रतीक होते. त्याला मिळालेल्या साडेतीन घटकांत त्याने रयतेच्या कल्याणाचे निर्णय घेतले आणि आत्ता पाच-पाच वर्षे सत्ता मिळूनही जनतेचे प्रश्न सोडवता न येणारे राज्यकर्ते असे चित्र आपण पाहात आहोत. म्हणून आपण शिराळशेठ आपल्यातून जाऊ देता कामा नये अशी इच्छा! 

राज्यनिर्मिती होऊन पन्नास-साठ वर्षे झाली तरीही प्रजेच्या पाणी, अन्न, वीज, निवारा ह्या महत्त्वाच्या गरजाही राज्यकर्त्यांना पूर्ण करता आलेल्या नाहीत, हे आज आपण अनुभवीत आहोत.
पण इच्छा असली तर काय करता येऊ शकते ते ह्या शिराळशेटने त्याला मिळालेल्या अवघ्या साडेतीन घटिकांमधून दाखवून दिले. त्या तेवढया वेळेत त्याने तातडीने जास्तीत जास्त देवस्थानांना वर्षासनें नेमून दिली. अनेक धार्मिक स्थळांना शक्य तेवढया सोयी-सुविधांसाठी मुबलक निधी उपलब्ध करुन दिला, देणग्या दिल्या. दानधर्म केला. जे एखाद्या राजाला दहा-बारा वर्षांमध्ये जमणार नाही एवढी धर्मकृत्यें त्याने केली.

त्याच्या ह्या औदार्याचे आणि धर्मशीलतेचे स्मरण म्हणून सातारा येथील शिराळे या गावी श्रावण शुध्द पंचमीला त्याच्या नावाने उत्सव साजरा केला जातो. त्याच्या प्रतिमेची पूजा केली जाते.
'जोडोनियां धन उत्तम वेव्हारें। उत्तमचि गती तो एक पावेल। उत्तम भोगील जीव खाणी॥' असे आपल्याला तुकोबांनी सांगितले आहेच.

 तुकोबा म्हणतात, जनहो, तुम्ही अतिशय उत्तम मार्गाने कोणाला न फसविता व्यापाद उदीम करा, व्यवसाय करा. त्याद्वारे भरपूर संपत्ती कमवा, आणि नंतर ती 'इदं न मम' ह्या विचाराने योग्य कामासाठी, विधायक कार्यासाठी खर्च करा. जो अशातऱ्हेने वागेल त्याला उत्तम गति तर मिळेलच शिवाय मनःशांतीदेखील लाभेल. शेवटी आत्मिक समाधान महत्त्वाचे!

तुकोबांच्या प्रत्येक शब्दाचा नीट विचार करावयास लागलो की, मन न सांगता आपसूकच अंतर्मूख होते. धन मिळवा पण कसे, तर सनदशीर मार्गाने मिळवा. चांगला उद्योग करुन मिळवा. लोकांना व्यसनी बनविणाऱ्या वस्तुंची निर्मिती करुन त्यांना, त्यांच्या नातलगांना आणि परिणामी साऱ्या समाजाला दुःखाच्या खाईत लोटून बख्खळ पैसा कमविला तरी त्याचा काय उपयोग?


दुधात पाणी घालून पाण्यासारखा पैसा मिळवायचा आणि तो तसाच उधळायचा ह्याला काय अर्थ आहे? एखाद्याला अडचणीत टाकून मग त्याच्याकडे लाच मागाल आणि समाजात उजळ माथ्याने फिरता यावे म्हणून गाजावाजा करुन दान कराल तरी ते 'पुण्य' म्हणून गणले जाणार नाही. नेकीने, श्रमाने पैसे कमवा, ते थोडे-थोडे करुन जमा करा आणि नंतर योग्य ठिकाणी 'सत्कारणी' लागतील अशातऱ्हेने त्याचा विनियोग करा. 'क्षणशः कणशश्चैव विद्या अर्थंच साधयेत्' असे पूर्वी लहानपणी मुलांना शिकविले जाई. क्षण-क्षण करुन प्रत्येक क्षण सत्कारणी लावून विद्या मिळवा आणि कण-कण करुन अर्थ म्हणजे धन जोडा. 'थेंबे थेंबे तळे साचे'- हा दाखलादेखील हेच सांगण्यासाठी दिला जाई.
आता पैसा खूपच मोठा झाला आहे. पण तो तसा मोठा होतांना खोटादेखील झाला आहे. काहीही न करता, दुसऱ्याला 'टोपी घालून किंवा 'शेंडी' लावून आपले खिसे कसे भरुन घ्यायचे ह्याच विचारात अनेकजण असतात. पैसा, आणखी पैसा, अधिक पैसा, सायकल, स्कूटर, गाडी अशा आपल्या इच्छा-आकांक्षा सतत अधिकाधिक हाव धरतांना दिसतात.

'मी-माझे'ह्यापलिकडील जगाची पर्वा करण्याची आजच्या पिढीला गरजच वाटेनाशी झाली आहे. ज्याच्याकडून 'लाभ' आहे त्याच्यावर 'लोभ' करावा एवढेच त्यांचे ब्रीद आहे की काय असे वाटते. त्याचा परिणाम म्हणजे मऊ गाद्यागिरद्या, एअरकंडिशनर असूनही मनःशांती मात्र तसूभरही लाभत नाही. जीव तळमळ तळमळ करीत राहातो.उद्याची-परवाची काळजी वाटत राहाते. झोपेची गोळी घेऊनही झोप लागत नाही.


तुम्ही परोपकाराची चव एकदा तरी चाखून बघा. दुसऱ्याला देण्यातील आनंद काय असतो ते एकदा तरी अनुभवा. मग ही जीवाची तगमग कधी अदृश्य झाली ते तुम्हाला कळणारदेखील नाही. त्यासाठी एक दिवस तरी प्रत्येकानें शिराळशेट बनावें!
संदर्भ :  कै. वा. गो. आपटे यांचा शब्दकोश, महाराष्ट्र शब्दकोश व प्रल्हाद कृष्ण प्रभुदेसाई यांचा ‘आदिशक्तीचे विश्वरूप अर्थात देविकोश खंड-१  (वाईच्या प्राज्ञ पाठशाळेच्या ग्रंथालयात उपलब्ध).