गढेगाळ (शापवाणी शिल्प)

ही शिळाशिल्पे बहुतेक वेळा शापवाणी (कर्स मेकर्स) करण्यासाठी निर्मिली गेली. वीरगळांप्रमाणेच यांचा उगम शिलाहारकालीन. यादवकाळातही हे गधेगाळ कोरले गेले.
वीरगळांसारखीच यांची रचना. उभट आयताकृती दगड आणि वर घुमटी. मात्र या गधेगाळांवर शिलालेख आढळतात. मुख्य म्हणजे हे शिलालेख देवनागरीत आहेत ते ही मराठी भाषेत.
घुमटीवर चंद्र सूर्य कोरलेले, त्याखालच्या चौकटीवर शिलालेख कोरलेला. वर काही मंगलवचने तर खालच्या बाजूस अभद्र वचने कोरलेली. व त्या खाली अजून एक शिल्प कोरलेले. त्या शिल्पात स्त्रीचा गाढवाबरोबर किंवा हत्तीबरोबर संकर दाखवलेला. हे गाढव शिल्प म्हणजे गधेगाळ व जिथे हत्ती असेल ते हत्तीगाळ.
काही वेळा ह्या असभ्य शिल्पांबरोबरच वरच्या बाजूस शिवलिंगाची पूजेचे शिल्प पण कोरले गेले आहे.
नागाव, अलिबाग येथील अक्षी गावातील गधेगाळ शिल्प सर्वात प्राचीनतम मानले जाते. डॉ. शं. गो. तुळपुळे यांनी याचे संपूर्ण वाचन केले.
गीं सुष संतु। स्वस्ति ओं। पसीमस- मुद्राधीपती।
स्त्री कोंकणा चक्री- वर्ती। स्त्री केसीदेवराय।
महाप्रधा- न भइर्जु सेणुई तसीमीनी काले प्रव्रतमने।
सकु संवतु: ९३४ प्रधा- वी सवसरे: अधीकू दीवे सुक्रे बौ- लु।
भइर्जुवे तथा बोडणा तथा नऊ कुवली अधोर्यु प्रधानु।
महालषु- मीची वआण। लुनया कचली ज-
शके ९३४ अर्थात इ.स. १०१२ मधला हा संकृत मिश्रीत मराठी शिलालेख मराठीतील सर्वात आद्य लेख आहे. श्रवणबेळगोळच्या गोमटेश्वराच्या सर्वमान्य आद्यलेखापेक्षाही जुना.
ह्याचा अर्थ असा-
कल्याण होवो. पश्चिम समुद्राधिपती श्री. कोकण चक्रवर्ती श्री. केसीदेवराय याचा महाप्रधान भइर्जू सेणुई याने शक संवत ९३४ प्रभव संवत्सर अधिक कृष्ण पक्ष शुक्रवार या दिवशी देवीच्या बोडणासाठी नऊ कुवली धान्य नेमून दिले. जगी सुख नांदो.
ह्या खालच्या तीन ओळींत मात्र अभद्र वचन कोरलेले आहे.
हे शासन कुणी भंग करील तेहाची माय गाढवे झबिजे
व त्या खालच्या शिल्पामध्ये गाढव व स्त्रीचा संकर दाखवलेला आहे.
ह्या शिलालेखाच्या वरील भागात चंद्र सूर्य कोरलेले असून मधल्या ओळी मात्र आता बर्‍याचशा पुसट झालेल्या आहेत.
रतनगडाच्या पायथ्याशी रतनवाडीतल्या अमृतेश्वर मंदिराच्या प्रांगणात एक हत्तीगाळ जमिनीत अर्धवट रोवलेला आढळतो. घुमटीवर चंद्र-सूर्य कोरलेले असून मधल्या चौकटीत शिवपिंडीचे पूजन दाखवले आहे. तर खालच्या बाजूस हत्तीबरोबर संकर दाखवला आहे. शिलालेखाच्या ओळी पूर्णपणे बुजलेल्या आहेत.
जो कोणी ह्या शिवलिंगाच्या पूजेचा अव्हेर करेल त्याची अशी अवस्था होईल असा ह्या शिल्पाचा अर्थ काढता येतो.
हे शिल्प शिलाहार झंझ राजाच्या कारकिर्दीत घडवले गेले असावे (साधारण १० वे शतक) कारण अमृतेश्वराच्या मंदिराचा कर्ताही तोच आहे. मंदिराशेजारीच काही वीरगळ पण आहेत.
अंबेजोगाई-वेळापूर इथल्या गधेगाळामध्ये संस्कृतमध्ये शापवाणी कोरलेली आहे.
स्वदत्तां परदत्तां वा यो हरेत वसुंधरा |
षष्टिं वर्ष सहस्त्रानि विष्ठायां जायते कृमि: ||
स्वकीय किंवा परकीय जो या वसुंधरेचे हरण करेल, असं करणारा सहा हजार वर्ष विष्ठेमधला कृमी बनेल
तर काटी येथील गधेगाळात 'हे जो मोडी राजा अथवा प्रजा तेयाची मायेसि गाढोअ' अशा प्रकारची मराठी वाक्यरचना आहे.
महाराष्ट्रातील काही गधेगाळ पुढीलप्रमाणे
१. कदंब भरूडदेव याचा सावरगाव लेख (इ.स. ११६४)
२. शिलाहार अपरादित्य याचा लोनाड लेख (मराठी)
३. शिलाहार अपरादित्य(द्वि.) याचा परळ लेख.
४. शिलाहार सोमेश्वरदेव याचा चांजे लेख( या लेखात शब्दरूपात गधेगाळ नसून शिल्परूपात आहे)
५. यादव रामचंद्र देव याचा पूर शिलालेख (इ.स. १२८५ फक्त शिल्परूपात)
६. यादव रामचंद्र देव याचा वेळापूर शिलालेख (इ.स. १२८५)
७. वेळूस शिलालेख (इ.स. १४०२)
९. शिलाहार राजा अनंतदेवाचा दिवेआगर शिलालेख(इ .स. १२५४)
अशी हीन दर्जाची शापवाणी कोरीव लेखांमध्ये कशी काय वापरली गेली याचा काहीच अंदाज येत नाही. यादव-शिलाहारांच्या लेखांतच आणि मुख्यत्वे मराठी भाषेतच ती आढळली आहेत आणि त्यातही गधेगाळीबरोबर बरेच वेळा शिवलिंगही असल्याने शैवपंथियांमध्येच अशा प्रकारची शिल्पे जास्त प्रचलित असावीत.
रतनवाडीतील हत्तीगाळ
 अक्षी येथील गधेगाळ(फोटो आंतरजालावरून)
 पिंपळवंडी गधेगाळ(फोटो शैलेन भंडारे यांजकडून)
दिवेआगर येथील श्री बाळ जोशी यांच्या खाजगी जागेत असलेला गधेगाळ शिलालेख यावर सन १२१४ मधील शिलाहार राजा अनंत देव यांच्या काळातील राम मंडलिक या अधिकार्याने गणपती नायक याला दिलेल्या एका दानपत्राचा उल्लेख आहे. 
संदर्भः
१. प्राचीन मराठी कोरीव लेख’ व ‘मराठी वाङ्मयाचा इतिहास’ संपादक : डॉ. शं. गो. तुळपुळे
२. महाराष्ट्राच्या इतिहासाचे साक्षीदार -प्रा. कल्पना रायरीकर, डॉ. मंजिरी भालेराव.